देवीचे स्थान शिखरावर आहे, परंतु मंदिर पायथ्याशी
कसे?
याबाबत
आख्यायिका अशी सांगितली जाते, की एक आदिवासी गरोदर स्त्री
वार्षिक यात्रेच्या वेळी दर्शनाला नियमाप्रमाणे शिखरावर जात असताना तिच्या पोटात
कळा येऊ लागल्या. तिला पुढे जाणे अशक्य झाले. तिने मातेची प्रार्थना केली. त्यावेळी
दृष्टांतात देवीने तिला सांगितले, की मी पायथ्यापाशी आहे. तेथे
दर्शनाला ये. आदिवासी स्त्री खडबडून जागी झाली आणि ती पायथ्याजवळ येताच महालक्ष्मी
देवीने तिला दर्शन दिले. त्या ठिकाणी मंदिर उभारले गेले.
वणी येथील सप्तशृंगी, औंधची यमाई, पुण्याची चतु:श्रृंगी यांचा
इतिहास पाहिला तर तोही याप्रमाणे आहे. मूळ स्थाने चढून जाण्यास कठीण आहेत अशा
ठिकाणी पायथ्याजवळ मंदिरे आढळतात.
महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी खोदताना सोन्याची मूर्ती व इतर धातूंच्या
तेरा मूर्ती मिळाल्या. त्या छोट्या मूर्ती बाहेर काढताच परिसरातील लोकांवर संकटे
कोसळू लागली असा समज पसरला. म्हणून त्या मूर्ती पुन्हा धार्मिक विधी करून गाडून
टाकल्या गेल्या अशी आख्यायिका आहे.
डोंगरावरील देवीचे मंदिर उभारणे व पायर्या करणे हे अवघड
काम नारायणराव जावरे यांच्या प्रयत्नांनी पूर्ण झाले. पूर्वीचे कोनवाड्यासारखे
छोटेसे देऊळ डोंगराच्या दोन कड्यांमध्ये गुहेत होते. त्यात ती तपश्चर्या करण्यात
बसत असे. त्या परिसरातील कडे तोडून डोंगरावरील दगडगोटे एकत्र करून, खड्डे बुजवून सर्व भाग प्रथम
सपाट करण्यांत आला. त्यानंतर बांधकामाला सुरुवात झाली. विटा, रेती, सिमेंट, लाकडे, पाणी व बांधकामाला लागणारी
हत्यारे मजुरांनी डोक्यावर, पाठीवर घेऊन चढवण्यात आली.
देऊळ परिश्रम घेऊन बांधण्यात आले. बांधकामाला जवळजवळ सहा वर्षे लागली. देवळाचे
क्षेत्र पंचाण्णव फूट लांब व साठ फूट रुंद असे स्लॅब टाकून पूर्ण करण्यात आले
आहे.
महालक्ष्मी मंदिराकडून डोंगरावर जाण्यास वाट आहे. त्या
वाटेने देवस्थानापर्यंत पोचण्यास दीड तासांचा अवधी लागतो. वाटेत मुसळ्या डोंगर
लागतो. तेथून पुढे जाण्यासाठी काँक्रिटचा रस्ता बांधलेला आहे. वाटेत अन्नपूर्णा
देवीचे मंदिर लागते. तेथून मुख्य देवस्थान पंधरा मिनिटांवर आहे. मात्र तेथून
पुढील मार्ग थोडा कठीण आणि जास्त चढ असलेला आहे. मग हनुमानाचे मंदिर दृष्टीस
पडते. तेथून महालक्ष्मीचे मुख्य मंदिर पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. डोंगरावरील
मंदिराजवळ पोचल्यानंतर सभोवतालच्या परिसराचे विहंगम दृश्य नजरेस
पडते.
मंदिराच्या आतील गाभारा संगमरवरी दगडाचा असून त्यात
गणपती,
महालक्ष्मी, सरस्वती, अंबामाता, राम-लक्ष्मण, सीता व राम, समोर हनुमान व शंकराची पिंड
बसवण्यात आली आहे. मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील
ब्राह्मणांच्या हस्ते माघ शुद्ध एकादशी, द्वादशी, त्रयोदशी (1992) असे तीन दिवस चालू
होता.
गाभा-याच्या उजव्या बाजूला लहान गुहा आहे. त्या
गुहेतून पुढे गेल्यानंतर महालक्ष्मीच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेता येते. गुहा
उंचीने फारच लहान आहे. त्यामुळे भाविकांना सरपटत आत जावे लागते. आत कमी जागा
असल्याने एकावेळी दोन किंवा तीनच भाविकांना दर्शन घेता येते. गुहेच्या आत डाव्या
बाजूला वळण आहे. तेथे पाणी पाझरताना आढळते. मात्र अरुंद जागा आणि अंधार असल्याने
तेथे कुणी जात नाही.