Buy Warli Painting Online

Warli Painting

डहाणू ची महालक्ष्मी आणि आदिवासींचे सांस्कृतिक जीवन

मंदिराचा पुजारी आदिवासी असण्याचे कारण, की जुन्या काळात तेथील सातवी कुटुंबातील कान्हा ठाकूर या आदिवासीच्या स्वप्नात महालक्ष्मी देवी आली. तिने मुसाल्या डोंगरावर असल्याचे सांगितले. ते ठिकाण अर्थात डोंगराच्या पायथ्यापासून चौदाशे फूट उंचावर आहे. तेव्हापासून देवीच्या पूजेचे काम सातवी कुटुंबांकडे आले. तत्कालीन सात सातवी कुटुंबांपैकी सहा कुटुंबे हयात असून प्रतिवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सातवी कुटुंबातील नवीन पुजारी पूजेचे काम स्वीकारतो. तो एक वर्ष पूजा सांभाळतो. 

मंदिराचे परंपरागत विश्वस्त म्हणून सातवी कुटुंबातली भावंडे या देवीची पूजाअर्चा तसेच आदिवासी परंपरागत विधी आणि उत्सव साजरे करतात. सध्‍या या घराण्‍यातील दहावी पिढी महालक्ष्‍मी देवीची व्‍यवस्‍था पाहात आहे. पूर्वीच्‍या राजांनी देवीच्‍या पूजेसाठी सातवी कुटुंबातील सात व्‍यक्‍तींची नेमणूक केल्‍याचे सांगितले जाते. त्यासाठी त्‍यांना सभोवतालचा मोठा परिसर इनाम म्‍हणून दिली. ही जागा कसावी आणि देवीची पूजा करावी असा आदेश त्‍यांना दिला. 

मंदिराच्‍या ट्रस्‍टकडून अस्तित्‍वात असलेल्‍या सहा कुटुंबांपैकी प्रत्‍येक कुटुंबातून दोन, अशा बारा व्‍यक्‍तींची निवड केली जाते. त्या व्‍यक्‍तींकडे देवीच्‍या पूजेपासून मंदिराच्‍या देखरेखीची पूर्ण जबाबदारी असते. सध्‍या लाडक्‍या गोविंद सातवी, नरेश जान्‍या सातवी, रमेश मंगळ्या सातवी, महेश रघुनाथ सातवी, काशीनाथ कान्‍हा सातवी, चंदू गणपत सातवी, सचिंद्र देउ सातवी, अमृत लहू सातवी, अशोक सुरेश सातवी, प्रकाश गणपत सातवी, बाळू गोविंद सातवी, विनोद जगन सातवी अशा व्‍यक्‍ती देवीच्‍या सेवेसाठी कार्यरत आहेत. आदिवासी या देवीला आपले कुलदैवत मानतात.

महालक्ष्मी ही आदिवासी समाजाची कुलदेवता आहे. तिच्‍याप्रती आभार व्याक्त करण्यासाठी दरवर्षी बारसी उत्सवाचे आयोजन केले जाते. भाद्रपदात पितर बारस साजरी केली जाते. त्या दिवशी मंदिरात एक दिवसाची यात्रा भरते. सर्व आदिवासी बांधव आपल्या शेतात पिकणारी पिके, तांदूळ, काकड्या, डांगर, चवळी, खुरासन आदी नैवेद्य म्हणून दाखवतात. त्याआधी हे सगळे खुल्या परिसरात असूनही कुणी भक्षण करत नाही. धरतीतरीमाता ही आदिवासींची मुख्य देवता. या खाण्‍यास ‘नवखाणे’ असेही म्‍हणतात.

त्या दिवशी 'तारपा' हे आदिवासींचे वाद्य पूजले जाते. त्यांच्या तालावर नाचत नृत्यपूजा बांधली जाते.दिवाळीनंतर तारपा बंद होतो. मग केवळ देवीच्या कार्यक्रमांनाच तारपानृत्‍य केले जाते. परंपरेनुसार सर्वप्रथम आदिवासी समाजातील सातवी कुटुंबीय महालक्ष्मी मातेची पूजा करते. त्या दिवशी महालक्ष्मी मातेचे मंदिर भक्तांसाठी रात्रभर खुले असते. नोकरीधंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेली आदिवासी मंडळी वारसी उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात.
त्‍यानंतर येणारे ‘वाघबारस’ आणि ‘माहिबारस’ हे उत्‍सव पुजार्‍याच्‍या घरी साजरे केले जातात. दिवाळीनंतर 'वाघबारस' साजरी केली जाते. तिसरी 'माहिबारस'. ही माघ महिन्यात साजरी केली जाते. त्या दिवशी परिसरातल्या देवदेवतांची पूजा केली जाते. बारशीत वंशपरंपरेने जतन केलेली जुनी, दुर्मीळ देवदेवतांची चित्रे पूजली जातात. पायथ्‍याजवळ असलेल्‍या मंदिरातील देवता पुजा-याच्‍या घरी नेऊन पुजल्‍या जातात. हा उत्‍सव पाच दिवस चालतो. प्रत्‍येक दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्या दिवसांत भाविक पुजा-याच्‍या घरी जमून देवीची पूजा करतात. पाचही दिवशी पुजा-याकडून भाविकांना जेवण दिले जाते.

मंदिराचा प्रसिद्ध उत्सव म्हणजे चैत्रपौणिर्मेला प्रारंभ होणारी आणि पुढे पंधरा दिवस चालणारी यात्रा. या यात्रेची तयारी ज्‍येष्‍ठ प्रतिपदेपासून होते. यात्रेच्‍या निमित्‍ताने मुंबई-अहमदाबाद या महामार्गावर घोल या गावाजवळ सूर्या नदीकाठी असलेल्‍या चाचू नावाच्‍या डोहात देवीचे कपडे धुतले जात असत. काठावरील दगडांना छोटी छोटी वर्तुळाकार छिद्रे पडलेली आहेत. त्या छिद्रांत भरपूर पाणी जमलेले असते. छिद्रे असलेले दगड पाहावयास मिळतात. त्याला लोक ‘सासूचे नाक’ म्हणून ओळखतात. जुन्‍या प्रथेनुसार तेथे देवीचे कपडे धुतले जातात. चैत्र महिन्‍याच्‍या पौर्णिमेपासून सुरू होणा-या जत्रेच्‍या पहिल्‍या दिवशी पुजारी देवीच्‍या अंगावरील कपडे घोल गाव जवळ सूर्या नदीकाठी धुतात. वर्षभरातून देवीच्‍या नऊ अंघोळी होत असून त्या प्रत्‍येक वेळी देवीचे कपडे धुतले जातात. देवीचे कपडे सूर्या नदीत धुतले जात असले तरी देवीला अंघोळ घालण्‍यासाठी मंदिर परिसरात असलेल्‍या विहिरीतील पाणी वापरण्‍याची प्रथा आहे.

डहाणू तालुक्यात आदिवासी शेतकर्‍यांकडून घेण्यात येणार्‍या भात, काकडी, चवळी आदी पिकांचा भोग महालक्ष्मीस चढवण्यात येतो. वारसी उत्सवानिमित्त तेथे एक दिवसाची यात्राच भरते. त्या दिवशी विविध प्रकारच्या मिठायांची, खेळण्याची तसेच शेतीविषयक औषधांची व अवजारांची दुकाने थाटण्यात येतात. यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे तेथे मिळणारे चिकन आणि मटण भुजिंग होय. फक्त भुजिंगसाठी इथे येणा-या लोकांचीही संख्याही लक्षणीय असते. चिकनचे भुजिंग बनवण्याकरता कोंबडीच्या मटणाचे छोटे-छोटे तुकडे करून विशिष्ट प्रकारचा मसाला लावून शिगेत घालून ते कोळशावर भाजले जाते. त्याचप्रमाणे मटणाचा खिमा करून त्याच्या मुठिया बनवल्या जातात. आदिवासींनी वर्षभर जंगलातून गोळा केलेली कंदमुळे, रानभाज्या, औषधी वनस्पती, सुकी मच्छी, विविध प्रकारचे मसाले, लसूण, कांदे अशा अनेक वस्तूंचा मोठा बाजार ह्या जत्रेत भरतो

Tribal toursim!

Virtual Tour - Dahanu's Mahalaxmi

Find us on Facebook

Map to Mahalaxmi

Dahanu Road Station [Western Rail way Mumbai suburban last station]> Charoti > Mahalaxmi 1. All MSRTC Buses routed to Mahalaxmi yatra 2. Regular 6 seater from Dahanu to Mahalaxmi 3. 6 seater from Dahanu to charoti & charoti to mahalaxmi autorikshaw 4. Individual vehicles [mahalaxmi is on NH 8, 125km from Mumbai towards Ahemadabad

Tribal Tourism