तळच्या मंदिराचा गाभारा पश्चिमाभिमुख आहे. म्हणजेच मुख्य
टेकडीवरील मंदिराकडे तिचे मुख आहे. मूर्ती गाभार्यात असून देवीचा मुखवटा दर्शनी
दोन फूट उंचीचा लांबट चेहरा असून शेंदूरचर्चित आहे. मस्तकावर चांदीचा मुकूट आणि
कुंडले आहेत. मागील बाजूस भव्य पाषाण असून त्याच पाषाणात दर्शनी मुखवटा कोरून
काढलेला आहे. मुखवट्यासमोर चांदीचे सिंह व जयविजय यांच्या मूर्ती मांडलेल्या
असतात,
पण त्यांचा
मुख्य मूर्तीशी काही संबंध नाही. सभामंडप, यज्ञकुंड, दीपमाळा सर्व काही आहे.
आजुबाजूला मोठ्या धर्मशाळा आहेत. पूर्वीचे मंदिर लाकडाचे होते. ते पावसामुळे खराब
होत गेल्यामुळे लाकडी खांब काढून तेथे दगडाचे मजबूत अठ्ठावन खांब बसवले. खांबांवर
मोठा घुमट, तीन लहान घुमट आहेत. मंदिर
रंगसंगतीने रंगवून आकर्षक केले आहे. मंदिर स्थापत्याच्या दृष्टीने सुंदर समजले
जाते.
मंदिरातील पुजेची परंपरा आदिवासी कुटुंबा कडे आहे.
देवीचे वर्षभरात चैत्र पौर्णिमा उत्सव, नवरात्रोत्सव आणि माघ
महिन्यातील शुद्ध द्वादशीला ‘वाघ बारसी’चा उत्सव असे तीन उत्सव होत
असतात. देवीच्या दर्शनासाठी आदिवासी, भंडारी, वाडवळ, कोळी, इराणी, बागायतदार यांची नेहमी गर्दी
असते. तिन्ही उत्सवांत अष्टमीला होम होतात. देवीची यात्रा चैत्र महिन्याच्या
पौर्णिमेपासून पंधरा दिवस भरते.