Buy Warli Painting Online

Warli Painting

सप्‍तश्रृंगी देवीः अर्धे शक्तीस्‍थळ

सप्‍तश्रृंगी देवीः अर्धे शक्तीस्‍थळ



सप्‍तश्रृंगी देवी मंदीर
महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून पासष्ट किलोमीटरवरील 4800 फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगगड. एकीकडे खोल दरी, तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई, असा निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे, असे वाटते.
आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे. मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन्‌ होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते, असे सांगितले जाते. या देवीचे महात्म्य मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात एकशे आठ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. त्यांपैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे. याव्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात.
ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगीदेवी, असे मानले जाते. नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता, येथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे. देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली, अशीही एक दंतकथा आहे. येथील निसर्गाचे रूप रम्य आहे.


सप्‍तश्रृंगी देवी मंदीर



सप्‍तश्रृंगी देवी डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित असून, रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती. शंकराचे त्रिशूल, विष्णूचे चक्र, वरुणाचा शंख, अग्नीचे दाहकत्व, वायूचा धनुष्यबाण, इंद्राचे वज्र व घंटा, यमाचा दंड, वरुणाचा पाश, दक्षप्रजापतीची स्फटिकमाला, ब्रह्मदेवाचे कमंडलू, सूर्याची किरणे, कालस्वरूपी देवीची तलवार, क्षीरसागराचा हार, कुंडले व कंकण, विश्‍वकर्माचा तीक्ष्ण परशू व चिलखत समुद्राचा कमलाहार, हिमालयाचे सिंहवाहन व रत्न आहे.
मूर्ती काहीशी झुकलेली आहे. त्याबाबतची कथाही गमतीदार आहे. गडाजवळच्या दरीजवळ मार्कंडेय ऋषी तपश्‍चर्या करीत होते. त्यांची प्रार्थना देवी ऐकत होती. तेव्हापासून प्रार्थना ऐकण्यासाठी झुकलेल्या अवस्थेतच देवीची मूर्ती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
सुमारे 472 पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे दर्शन होते. चैत्र व नवरात्र असे दोन उत्सव येथे होतात. चैत्रात देवीचे रूप हसरे, तर नवरात्रात ते गंभीर असल्याचे सांगितले जाते. चैत्रोत्सव देवीच्या माहेरच्यांचा, तर नवरात्रोत्सव सासरच्यांचा, असे गमतीदार कारणही त्यामागे सांगितले जाते. नवरात्रात विविध कार्यक्रम येथे होत असतात. देवीजवळ घट बसवून नवरात्रास प्रारंभ होतो. देवीला रोज वेगळ्या रंगाचे वस्त्र नेसविण्यात येते. तिला अकरा वार साडी लागते. चोळीसाठी तीन खण लागतात. नऊ दिवस विविध रूपांत पूजा-अर्चा केली जाते. नवमीच्या दिवशी होमहवन होऊन दसऱ्याच्या दिवशी पूर्णाहुती दिली जाते. त्यानंतर नेवैद्य दाखविला जातो. दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या शिखरावर ध्वज लावण्याची परंपरा आहे. हा मान दिंडोरी तालुक्‍यातील दरेगावच्या पाटील कुटुंबीयांस आहे; मात्र ते हा ध्वज कसा लावतात हे कोणालाही समजत नाही.
गडावर सप्तशृंगीच्या मंदिराशिवाय पाहण्यासारखी इतरही काही ठिकाणे आहेत. मार्कंडेय ऋषींनी तपश्‍चर्या केलेला डोंगर व कोटीतीर्थ तेथेच आहे. याशिवाय पाण्याची बरीच कुंडे आहेत. पूर्वी 108 कुंडे होती; मात्र आता त्यांतील बरीच बुजली आहेत. याशिवाय तांबुलतीर्थ, काजळतीर्थ व अंबालतीर्थ ही तीन महत्त्वाची कुंडे आहेत. तांबुलतीर्थाचे पाणी तांबडे आहे. देवीने विडा खाऊन थुंकला म्हणून हे पाणी तांबडे झाल्याची दंतकथा सांगितली जाते. गडाची व्यवस्था पाहण्यासाठी ग्रामपंचायत आहे. याशिवाय देवीचे विश्‍वस्त मंडळही आहे. त्यांच्यातर्फे येथे बऱ्याच सुविधा करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या निवासाची उत्तम व्यवस्था गडावरच आहे. याशिवाय जेवणाच्या रूपातील प्रसादही भाविकांना दिला जातो. भाविकांच्या गर्दीमुळे गडावरच आता सर्व सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अगदी हॉटेलसह सर्व वस्तूंची दुकाने येथे आहेत.
गडावर जाणे आता सर्वांना सहजशक्‍य झाले आहे. नाशिकसह जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या आगारांनी नवरात्रोत्सवाची गर्दी लक्षात घेऊन थेट गडापर्यंत जादा बस सुरू केल्या आहेत. या काळात खासगी गाड्यांना गडाखालीच उभे करावे लागते. त्यापुढे फक्त एसटी बस जाऊ शकतात. त्यामुळे थेट गडापर्यंत जाता येते. याशिवाय, गड चढून जाण्यासाठी नांदुरीतून पायऱ्यांचा रस्ता आहे.
कसे जाल?
हवाई मार्ग- सप्तश्रृंगी देवीला जाण्यासाठी जवळचे विमानतळ मुंबई किंवा पुणे आहे. तेथून नाशिकला यावे लागेल.रेल्वे मार्ग- सप्तश्रृंगी देवीला जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन नाशिक आहे.रस्ता मार्ग- सप्तश्रृंगी गड नाशिकपासून ६५ किलोमीटरवर आहे. नाशिकहून सप्तश्रृंगी देवीला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या तसेच खासगी गाड्याही उपलब्ध आहेत


original at - http://meemarathi.blog.co.in/2009/06/16/%e0%a4%b8%e0%a4%aa%e0%a5%8d%e2%80%8d%e0%a4%a4%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%83%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%83-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a5%87/

महालक्ष्मीच्या पुजेचे बुकींग होणार ऑनलाईन

महालक्ष्मीच्या पुजेचे बुकींग होणार ऑनलाईन



कोल्‍हापूर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीरची महालक्ष्मी देवी आणि दख्खनचा राजा ज्योतीबा या देवालयांच्या व परिसराच्या सुधारणेसाठी मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात असून तो लवकरच सर्व आमदार, खासदार जिल्हाधिकारी यांच्यापुढे सादर केला जाणार आहे. यात विविध सुधारणा सुचविण्यात आल्या असून परगावच्या भाविकांना पुजेसाठी ऑनलाईन बुकींग करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय सुरक्षितता म्हणून मंदिरात सीसी टिव्ही कॅमेरेही बसविण्यात येणार आहेत.
समितीचे नूतन सचिव भरत सुर्यवंशी यांनी १ जूनला पदभार स्वीकारला. देवस्थान समितीतला अंदाधुद कारभार थांबवून उत्पन्न वाढ, मंदिराचे पावित्र्य, सुधारणा स्वच्छता याची माहिती आज त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मंदिरात या सुधारणा करणार१. परगावच्या भाविकांसाठी सोयीसाठी महालक्ष्मीच्या पूजेसाठी ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे.२. मंदिराचे पावित्र्य लक्षात घेऊन स्वच्छतेवर अधिक भर देण्यात येणार आहे.३. मंदिरात चपलाना बंदी घातली जाईल.४. ऐतिहासिक वास्तू असलेल्या दगडी बांधकामाला जपण्याचे प्रयत्न करण्यात येतील.५. मंदिरात प्रकाश व्यवस्था व नगारखान्यातील वाजत्र्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था६. ध्वनीक्षेपण यंत्रणा, सीसी टिव्ही कॅमेरा बसवले जाणार आहेत.७. ज्योतिबावरही प्रभावळ दुरुस्ती, वातानुकुलित यंत्रणा यासारख्या सुधारणा करण्यात येणार आहेत.
निधी असा जमा करणारया मंदिराच्या सुधारणेसाठी विशेष प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. उदागिरी येथे समितीची तीन हजार एकर जागा असून शासन त्यावरील रॉयल्टी म्हणून मिळालेले १५ लाख रुपये देवस्थान समितीला देणार आहे. दुबई येथील एका भाविकाने २१० कोटी रुपये मंदिराच्या सुधारणेसाठी देण्याची तयारी दर्शवली आहे. ग्वाल्हेरच्या ज्योतिरादित्य देवस्थान ट्रस्टकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या सर्व पैशातून महालक्ष्मी मंदिर व जोतिबा देवस्थान विकासाबाबत मास्टर प्लॅन तयार करण्याची योजना असून त्यासाठी लोकप्रतिनिधी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.


original at - http://meemarathi.blog.co.in/2009/06/17/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a5%81/

रानात, फुलात; कोकणच्या गावात!




हातात रिझव्हेर्शन, तारांकित हॉटेलातील बुकिंग, ठरीव न्याहरी-जेवण आणि प्रेक्षणीय स्थळे किंवा रिझॉर्टमधील तेच वातावरण...यांच्या बाहेर पडून स्वत: सहल आखून कोकणासारख्या हिरव्यागार प्रांतात जाण्याचा अनुभव घ्यायला हवा. तिथल्या एखाद्या छोट्याशा गावात, निसर्गाच्या सान्निध्यात मुलांना काही दिवस राहायला मिळणे आणि सर्वांनी मिळून समूहजीवनाचा अनुभव घेणे, यातली मजा काही औरच...

...........

मे महिन्याच्या भल्या मोठ्या सुटीत करायचं काय, या मुलांना आणि त्यांच्या पालकांना पडणारा प्रश्ान्च असतो. दहावीत आणि बारावीत जाणाऱ्या मुलांना तर आता मे महिन्याची सुटी असते, असे आपण म्हणतच नाही. त्यांचा लगेच अभ्यास सुरूही होतो. पण इतर मुलांपैकी काही जातात छंद वर्गात. काही सचिन तेंडुलकरच्या फोटोच्या पाया पडून, कीटचे ओझे सांभाळत मैदानावर जातात. काही लिटल चॅम्प होण्याचे स्वप्न उराशी बाळगून गाणे शिकायला जातील. अर्थात, हे सारे न करणारीही हजारो मुले असतातच.

काही कुटुंबांमध्ये आता विचार सुरू होईल बाहेरगावी जाण्याचा. एखाद्या सहल कंपनीमध्ये भरभक्कम पैसे मोजून आठ दिवसांसाठी जायचे. ते ही घरातल्या तिघांनी किंवा चौघांनी. मात्र, अशा सहलींमध्ये जी प्रेक्षणीय स्थळे मोठ्या माणसांना बघायची असतात, ती पाहण्यात लहानग्यांना अजिबातच रस नसतो. त्यामुळे त्यांची रड, कंटाळा, धुसफूस सांभाळत; कधी त्यांना रागावत तर कधी प्रेमाने समजावत सगळ्यांबरोबर दिवसभर फिरत राहायचे आणि रात्री तारांकित हॉटेलात डोळे मिटत असताना शिरायचे. लहानग्यांचे आणि आपले कपडे जमेल तसे पिळून टाकायचे. मोबाईलवर सकाळी सहाचा गजर लावून झोपायचे. आणि खर्च बराच झाला पण आराम आणि पाहणे खूप झाले, असे म्हणत स्वत:चीच समजूत काढत परत मुंबई गाठायची. दुसऱ्या दिवशी धावपळ सुरू.

खरे पाहता आपल्याला आवश्यकता असते सैलसर व स्वच्छंदी जीवन जगण्याची. काटेकोर धावपळीचा, रोजच्या पोशाखी वागण्याचा आणि रोज आपण खात असलेल्या खाद्यपदार्थांचा कंटाळा घालवण्याची.

थोडा विचार केला तर यातून आपल्याला चांगला मार्ग काढता येईल. आपल्याला आणि मुलांना मनमोकळे व मनसोक्त राहता येईल. घरी असणाऱ्या महिलांनी मुलांचे बाबा सोबत आले तर त्यांच्यासहित किंवा त्यांना जमणार नसले तर त्यांच्याशिवाय, आपल्या समवयस्क मैत्रिणींचा छानछोटा ग्रुप बनवावा. हा गुप तीनचार जणींच्यावर मात्र नसावा. मग कोकणातल्या एखाद्या खेड्यातले घर १५-२० दिवसांसाठी भाड्याने मिळवावे. आसपास थोडी चौकशी केली तर कोकणातल्या कितीतरी गावांमधली अशी घरे उपलब्ध होऊ शकतील. कोकणाचा हा सारा परिसर अत्यंत रम्य तर आहेच पण तो अत्यंत सुरक्षित प्रदेश आहे. कोणत्याही गावात कोणत्याही वेळी तुम्ही बिनघोर राहू शकता. फिरू शकता. या गावांमधले गावकरी काही त्रास तर देणार नाहीतच उलट जमेल तेवढी मदत करतील.

कोकणात आज बऱ्याच सोयी आहेत. तालुक्यांच्या ठिकाणी सुपर माकेर्टपासून-बँकापर्यंत सगळ्या सोयीसुविधा आहेत. सर्व गावांमध्ये पिशवीतून दूध मिळते. बहुतेक गावांमध्ये आता नळपाणी योजना आहेत. तिथे गॅस सिलेंडरही सहज मिळतो. दूरध्वनी सेवा खेडोपाडी पोहोचली आहे. गरज पडल्यास, डॉक्टरही आहेत. पण त्यांची गरजच भासणार नाही. मुंबईहून नेलेली औषधेही न वापरता परत आणावी लागतील.

परीटघडीची बांधिलकी नसल्यामुळे मोकळा-चाकळा वावर व मुलांचे उघड्या अंगाने दिवसभर झाडामाडात हुंदडणे, गुराढोरांचा आणि झाडाझुडपांचा अनोखा प्रेमळ सहवास हे सारे वातावरण मुलांना अनुभवू दे. इन्फेक्शन आणि परीटघडीचे मॅनर्स यांचा मुळीच बाऊ करू नका. सगळ्या भीती विसरून मस्त राहात येईल. मैत्रिणी मैत्रिणी मिळून रोज नवनवीन पदार्थ करून मनसोक्त खाता येतील. अशा वातावरणात मुले न कंटाळता एकमेकांमध्ये मिळून-मिसळून दिवसभर खेळत राहतील. दिवसभर खेळून दमून त्यांना रात्री मस्त झोप येईल. सकाळी उठून ती पाहतील तर एखादी मनीमाऊ त्यांच्या अंथरूणात येऊन झोपलेली असेल. तुम्हीही पहाटे अंगणात येऊन बसलात तर तुम्हाला समाधी लागल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.

कोकणात जायला आता भरपूर वाहतुकीच्या सोयी सहज उपलब्ध आहेत. रेल्वे आहे, खासगी बस आहेत, एसटी आहेत. आराम बसमधील प्रवासापेक्षा, साध्या एसटीतून अवश्य प्रवास करून बघा. एसटीचे जाळे आता अगदी छोट्या गावांपर्यंत पोहोचले आहे. तसेच, एसटीच्या वेळापत्रकातही खूप नियमितता आली आहे. एसटीतून प्रवास म्हणजे समाजातील सर्व प्रकारच्या लोकांशी प्रत्यक्ष संपर्क. या अशा संपर्काचा अनुभव मुलांना जरूर घेऊ द्यावा. त्यातून त्यांच्या संवेदना अधिक जाग्या होतील. कदाचित्, न दिसलेले जगही त्यांना या प्रवासात दिसण्याची शक्यता आहे.

असे हे मुक्त प्रवासाचे १५-२० दिवस तुम्हाला वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा देतील. तुम्हाला व तुमच्या मुलांना हे निसर्गाच्या सहवासातले अनुभव नक्कीच समृद्ध करतील. तुमच्या माणूसपणाला नवा आराम मिळेल. एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन, आपसात देवघेव करून, लहानसहान श्रम एकत्रित करून मुलांवर एक वेगळाच संस्कार नकळत झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या राज्यातील एक प्रदेश त्यांना 'आतून' दिसेल, हा आणखी एक फायदा. समूहजीवनाचा एक नवा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.

साऱ्या गोष्टी तयार आणि जिथल्या तिथे मिळण्याऐवजी स्वत: आखणी करून अमलात आणण्यातही मजा असते. ती मजा अशा ट्रिपमुळे अनुभवता येईल. मग विचार कसला करताय? जमवा मित्रमैत्रिणी आणि मुलांना घेऊन स्वत: सफरीवर निघा!

रिफ्रेश व्हायचंय?



पद्मश्री राव


वीकएण्डला अनेक जण छोट्या ट्रिप आखत असतात. त्यासाठी मुंबईपासून जवळ असलेल्या ठिकाणांना प्राधान्य दिलं जातं. बरेचदा अशा ट्रिप एखाद्या बीचवर किंवा रिसॉर्टवर काढल्या जातात. पण एखाद्या धरणावर जाण्याचा बेत तुम्ही कधी बनवला आहे का? मुंबईपासून जवळच असलेल्या बदलापूरमध्ये एक सोडून दोन धरणं आहेत. बारवी डॅम आणि चिखळोली डॅम. या दोन्ही धरणांचा परिसर रम्य आणि शांत असल्याने एका दिवसात रिफ्रेश होण्यासाठी इथे जायला काहीच हरकत नाही.

.........

दशकभरापूवीर् ठाणे जिल्ह्यातलं देखणं आणि नेटकं गाव म्हणून बदलापूर प्रसिद्ध होतं. आता मात्र बदलापूरने कात टाकून शहरी रूप धारण केलं आहे. बदलापूर, अंबरनाथ ह्मद्ध गावांवर मुंबईचा प्रभाव पडल्यामुळे त्यांचा विकास झपाट्याने झाला. बदलापूर आता शहर बनलं असलं तरी त्याने आपल्या 'गावपणा'च्या खुणा जपल्या आहेत. स्टेशनपासून आत गेल्यावर हे गाव एकेकाळी किती टुमदार, रमणीय असेल याची साक्ष मिळते. या परिसरात पाहण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. विशेषत: एक दिवसाच्या सहलीसाठी ही ठिकाणं चांगली आहेत. बदलापूरच्या बारवी डॅमवर हौशी पर्यटकांची बरीच गदीर् दिसते.

बारवी हे उल्हास नदीवर बांधलेलं धरण आहे. इथलं निसर्गसौंदर्य आपल्याला मोहीत करतं. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव धरणावर सगळीचकडे फिरता येत नाही. बारवी डॅमच्या परिसरात अनेक रिसॉर्ट्स आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या निवास-भोजनाची व्यवस्था होतेे. बदलापूर स्टेशनपासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर हा डॅम आहे. हा सारा परिसर घनदाट वृक्षांनी वेढलेला आहे. उल्हास नदीच्या दोन्ही किनाऱ्यांना जोडणारा एक पूल आहे. मात्र इथे पुलाखाली जाण्यास मनाई आहे.

सुट्टी असते तेव्हा अनेक जण एखाद्या बीचवर जाणं पसंत करतात. अलिबागचे सर्वच समुदकिनारे सुट्टीच्या दिवशी गजबजलेले असतात. परंतु थोडा बदल म्हणून एखाद्या वीकएण्डला मुंबईपासून जवळच असलेल्या बारवी डॅमला जायला काही हरकत नाही.

बदलापूरातलं आणखी एक धरण प्रेक्षणीय आहे. ते म्हणजे चिखळोली धरण. बारवी डॅमच्या तुलनेत कमी प्रसिद्ध असलेलं हे धरण बदलापूरच्या पूवेर्ला आहे. बदलापूर स्टेशनपासून सुमार सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. हे धरण छोटेखानी असलं तरी आजूबाजूचा परिसर मात्र प्रेक्षणीय आहे. बदलापूर स्टेशनपासून थेट रिक्षेनेही इथपर्यंत येता येतं. बारवी डॅम इतकी सुरक्षाव्यवस्था इथे नसली तरी हे धरण तुलनेत कमी धोकादायक आहे. तरीही पर्यटकांनी अगोदर माहिती घेतल्याशिवाय पाण्यात उतरण्याचा धोका पत्करू नये. चिखळोली धरणाचा परिसर अतिशय शांत आहे. इथे जाण्याची खरी मजा पावसाळ्यात आहे. कारण पावसाळामुळे फुललेली इथली हिरवळ भुरळ पाडते. पण पावसाळ्याखेरीज एरव्ही कुठलाही मोसमात चिखळोली धरणाला भेट द्यायला हरकत नाही कारण शांत ठिकाणी थोडा वेळ घालावायची इच्छा असणाऱ्यांना यासारखं दुसरं ठिकाण सापडणार नाही.

बारवी किंवा चिखळोली धरणावर जायचा बेत आखत असल्यास काही गोष्टी ध्यानात ठेवा:

* बारवी डॅमला जाण्यासाठी बदलापूर स्टेशनपासून बससेवा उपलब्ध आहे.

* चिखळोली डॅमला रिक्षाने जात येत असलं तरी रिक्षा परतीसाठी थांबणारी असावी. कारण परत जाण्यासाठी इथे कुठलंही वाहन उपलब्ध नाही.

* स्वत:चं वाहन असल्यास सहलीचा आनंद अधिक मोकळेपणाने लुटता येईल.

विक्रमगडचा निसर्ग खुणावतो!



तुम्हाला स्वत:चा शोध घ्यायचाय. रोजच्या धावपळीतून मस्त वीकेण्ड एन्जॉय करायचाय. नाहीतर समस्त जुन्या मित्रमंडळींच
ा झकास ट्रेकिंगचा प्लॅन आहे. शहराच्या धकाधकीपासून दूर कुठेतरी रम्य ठिकाणी जायचं असेल, तर मग तुम्ही नक्की विक्रमगडचा रस्ता धरा, असा सल्ला दिलाय ' बिनधास्त' शर्वरी जमेनिस हिने.

.......

ठाणे-जव्हार रस्त्यावर असलेला विक्रमगड हे माझं खास आवडतं ठिकाण. चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने आम्ही कलाकार वेगवेगळ्या साइट, लोकेशन्स आणि शहरांमधे फिरत असतो. या ठिकाणांचं खास वेगळेपण, त्यांची वेगळी अशी ओळख, तिथे प्रसिद्ध असलेल्या वस्तू आणि पदार्थ यांचा शोध घेऊन हमखास त्यांना भेटी देणं ठरलेलंच. त्या त्या दिवसांपुरतं आम्ही तिथलं आयुष्य जगतो. पण शूटिंगमुळे हा नित्याचाच भाग झाला आहे. त्यामुळेच खास धमाल किंवा वेगळं काही अनुभवायचं असेल, मस्त फिरायचं असेल तर हटके अशा विक्रमगडला भेट द्यायलाच हवी.

ट्रेकिंगसाठी निघायचं म्हणजे खास आकर्षण असलेल्या रिव्हर क्रॉसिंग, जंगल सफारी, रॉक क्लायम्बिंग यांचाही आनंद इथे उपभोगता येतो. शिवाय इथली शांतता, निसर्गरम्य परिसर, नदीचे निर्मळ-स्वच्छ पाणी, शुद्ध हवा अगदी मन मोहून टाकणारी आहे. विक्रमगडावरील एका आदिवासी पाड्यावर दिवेकरांचं मस्त रिसॉर्ट आहे. खास ग्रामीण टच असलेल्या या रिसॉर्टवर धम्माल आणि मनमुराद जगण्याचा आनंद लुटता येतो. पण शांत आणि मोकळ्या वातावरणामुळे निसर्गाच्या अधिक जवळ गेल्याचं समाधान मिळतं. या रिसॉर्टवर राहण्याची उत्तम सोय तर आहेच शिवाय अस्सल ग्रामीण टच असलेलं रुचकर जेवणही उपलब्ध आहे. या मोकळ्या वातावरणात आपल्याला मस्त सपाटून भूक लागते आणि या अस्सल चवीच्या जेवणाने वेगळंच समाधान मिळतं. मुंबईपासून अगदी जवळ शिवाय निसर्गाच्या सान्निध्यात एक-दोन दिवस राहून पुन्हा ताजं तवानंही होऊ शकता येतं. मग कधी निघताय 'भटकंती'साठी विक्रमगडला? इथला शांत परिसर अनुभवायला. स्वत:चा शोध घ्यायला?

- शब्दांकन : विनय उपासनी

माहुलीचा इतिहास जागवताना



माहुली किल्ल्याचा स्वराज्यात समावेश झाल्याला ३५१ वर्षं पूर्ण झाल्याबद्दल माहुली निसर्ग मंडळातफेर् शहापूर, तसंच
माहुलीच्या परिसरात 'माहुली महोत्सव' आयोजित केला होता. त्यानिमित्त माहुलीच्या इतिहासाला दिलेला हा उजळा.

......

महाराष्ट्रातल्या इतर किल्ल्यांप्रमाणेच माहुली इतिहासाबद्दल फारसा बोलत नाही. भंडारगडावरील चोर दरवाजातल्या शिलालेखाव्यतिरिक्त कुठल्याही लिखित नोंदी माहुलीवर नाहीत. परंतु त्याचा ज्ञात इतिहास खरोखरच अभिमानास्पद आहे. या किल्ल्याचं बांधकाम शिलाहारांच्या काळात झालं, असा उल्लेख ठाणे जिल्हा गॅझेटिअरमधे सापडतो. परंतु माहुली किल्ल्याचाच एक भाग असलेल्या भंडारदुर्गावरील पाण्याच्या टाक्यावरून तो शिलाहारांपूवीर्च्या काळातही अस्तित्वात असावा. याला प्रमाण म्हणजे या पाण्याच्या टाक्याची बांधणी. अशी बांधकामं लेण्यांचा काळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातवाहन कालखंडात केली जात.

किल्ल्याचा ठोस पुराव्यांवर आधारित इतिहास १४८५ पासून सुरू होतो. १४८५ मधे निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमदने कोकणातील इतर किल्ल्यांबरोबरच माहुलीचा किल्लाही ताब्यात घेतला. १६३५ मधे संगमनेर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर शहाजी राजांनी निजामाचा शेवटचा वंशज मूतीर्जा याला निजामशाह म्हणून घोषित केलं. निजामशाही संपवण्यासाठी १६३५ मधे शाहजहान स्वत: महाराष्ट्रात उतरला होता. विजापूरच्या आदिलशहाला त्याने आपल्या बाजूला वळवलं. निजामशाही वाचवण्याच्या धामधुमीत पेमगिरी-जीवधनचा किल्ला सोडून शहाजीराजांनी लहानगा शिवबा आणि जिजाऊंसह माहुलीचा आश्रय घेतला. १९६३ मधे मुघल सेनापती खानजमान आणि रणदुल्लाखान यांनी माहुलीला वेढा दिला आणि शहाजीराजे आणि निजामशहाची कोंडी केली. ऑक्टोबर १६३६ तहामधे शहाजीराजांना माहुलीचा किल्ला खानजमान आणि रणदुल्लाखानाकडे सुपूर्द करावा लागला. निजामशाही बुडाली आणि त्याचबरोबर शहाजीराजांचे मराठेशाहीचं स्वप्न भंगलं. त्यांना आदिलशहाची चाकरी स्वीकारणं भाग पडलं. शहाजीराजांची बंगळूरला रवानगी करण्यात आली. त्यानंतर माहुलीचा किल्ला कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे ये-जा करत राहिला. १६५७ मधे कल्याण-भिवंडी फत्ते करून स्वराजाच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवून शिवाजी महाराज जातीने माहुलीवर चालून गेले. ८ जानेवारी १६५८ मधे शिवाजी महाराजांनी तो मोगलांकडून जिंकला आणि शहाजीराजांच्या पराभवाचे उट्टं फेडलं. पुढील केवळ आठ वर्षं माहुली स्वराज्यात होता. १६६५ मधे मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहात माहुलीचा ताबा पुन्हा मोगलांकडे गेला.

शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका होताच उत्तर कोकणाच्या मोहिमेदरम्यान शिवाजी महाराजांनी १५०० मावळ्यांसह जातीने रात्री अचानक छापा घालून माहुलीचा किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला. पण या मोहिमेत १००० मराठे कापले गेले. फारच जबर फटका महाराजांना बसला. मात्र महाराजांनी लवकरच संधी साधली. मोरोपंत पिंगळ्यांनी माहुलीस वेढा दिला. सुमारे दोन महिने माहुलीस वेढा टाकून हल्ले सुरू होते. १६ जून १६७० रोजी निकाराचा एल्गार झाला आणि माहुलीवर पुन्हा एकदा मराठ्यांचे निशाण चढले, असं या लढाईचं वर्णन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं आहे. तेव्हापासून १८१७ मधील इंग्रज आणि पेशवे यांच्यातल्या पुणे तहापर्यंत जवळजवळ दीडशे वर्षं या किल्ल्याचं स्वामित्व मराठ्यांकडे होतं. एक अभेद्य तसंच महाभयंकर किल्ला (स्नश्ाह्मद्वद्बस्त्रड्डड्ढद्यद्ग स्नश्ाह्मह्ल) म्हणून या किल्ल्याचं वर्णन ठाणे जिल्हा गॅझेटियरमधे सापडतं.

१८१८ मधे कॅप्टन डिकन्सन नामक इंग्रज अधिकारी माहुलीवर आला. त्याने स्वत: फिरून माहुलीचं सवेर्क्षण केलं. सन १८१८ मधील कॅप्टन डिकिन्सनच्या भेटीपर्यंत गडावरील काही वास्तू शाबूत होत्या. मात्र १८६२ च्या आसपास किल्ल्याचं आणखी नुकसान झालं आणि किल्ल्यावरची तटबंदी जवळपास नष्ट झाली. माहुलीच्या दक्षिणेकडील एका घळीत एक दरीच्या तोंडाशी एक वैशिष्ट्यपूर्ण तुरुंग असल्याचं गॅझेटिअरमधे म्हटलं आहे.

शिवाजी महाराजांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या उपस्थित रायगडावर झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्रातील अनेक पवित्र तीर्थक्षेत्रं आणि किल्ल्यांवरील पाण्याने महाराजांच्या समाधीला अभिषेक करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ३०० हून अधिक तीर्थक्षेत्रं आणि किल्ल्यांवरून आणलेल्या पाण्याचे कुंभ रायगडावर आणले होते. राजांच्या समाधीवर अभिषिक्त होण्याचा पहिला मान होता तुळजापूरहून आणलेल्या जलकुंभाचा. त्यानंतर शिवनेरी आणि त्यानंतर महाराजांचं बालपण पाहिलेल्या माहुलीच्या गडगंगेला तिसरं मानाचं पान देऊन गौरवण्यात आलं होतं.

माहुलीवर आढळणारे घरांचे प्रशस्त चौथरे, तलाव तसंच मानवी वस्तीच्या खाणखुणा पाहत एकेकाळी या किल्ल्यावर प्रचंड वस्ती असावी. मात्र आता किल्ल्यावर उरले आहेत काही वीरगळ, भग्न तटबंदी, दगडधोंडे, चौथरे आणि मानवी वस्तीच्या खुणा दर्शवणारी आंबा, फणस, बकुळीची झाडं...

- रवींद पानसरे



original at - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4048980.cms


शांततेचा निवारा



-


शांत आणि खळखळ नाद करत जाणारी नदी हे खडावलीचं मुख्य आकर्षण. नदीचा मंद खळखळाट आणि गार वाऱ्याची झुळूक मनाला उभारी देते. ठाण्यापासून एक तासाच्या अंतरावर असलेलं 'खडावली' गाव रूटीनला कंटाळलेल्या मंडळींसाठी चांगला पिकनिक स्पॉट आहे.
.......

' जिथे शांतता निवारा शोधत येते

अशा एका तळ्याकाठी बसावेसे वाटते! '

कवी अनिल यांच्या या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर ठाणे जिल्ह्यातल्या खडावलीला एकदा भेट द्यायलाच हवी. गावातून वाहणारी नदी हे इथलं मुख्य आकर्षण. मंद खळखळाट करत वाहणाऱ्या नदीचं चमचमतं पात्र पाहिलं की एखादी अल्लड लहानगी दुडूदुडू धावत, डोळे मिचकावत आपल्याला बोलावते आहे असं वाटतं. नदीच्या किनारी वाऱ्याची थंड झुळूक स्पर्शून जाते. तिचा स्पर्श आणि नदीचा सूरमयी नाद आपल्याला आकषिर्त करतात. एका क्षणात मनाला आलेला थकवा निघून जातो. मनावर साचलेली धूळ उडून जाते. निसर्गाच्या जादूने आपण मंत्रमुग्ध होतो... रोज ट्रेन पकडायची, गदीर्चे धक्के सहन करायचे... या रूटीनला कंटाळलेल्या मंडळींसाठी 'रिचार्ज' होण्यासाठी खडावली हे उत्तम ठिकाण आहे.

पूवीर् या गावात खूप खड्डे होते म्हणून त्याला 'खड्डावली' म्हणू लागले. नंतर ते 'खडावली' झाल्याचं सांगितलं जातं. इथल्या नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी दूरहून पर्यटक खडावलीला भेट देतात. नदीचा किनारा सोपा असून त्याची रचना सपाट खडकांची आहे. ही नदी शांत आणि उथळ असल्याने मुलांपासून, महिला आणि वृद्ध नदीत डुंबण्याचा आनंद घेऊ शकतात. तसंच किनाऱ्यावर चहा, भजी आणि वडापाव यांची छोटी टपरीवजा दुकानंही आहेत. पाण्यात मनसोक्त डंुबून हुडहुडी भरली की गरमागरम भजी खाण्याचा आणि सोबत कटिंग चहा पिण्याचा आनंद काही निराळाच असतो.

शांत वाहणाऱ्या नदीच्या किनारी स्वामी समर्थांचा सुंदर मठ आहे. इथल्या शांततेवर एक अध्यात्मिक अस्तर असल्यासारखं वाटतं. मठातला गारवा शांतता अधिक गहिरी करतो. टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन घेतल्यावर अनेक भाविक या मठात येतात. भाविकांना मठात ध्यानधारणा किंवा नामस्मरणही करता येतं. खडावलीच्या वेशीवरच हनुमानाचं मंदिर आहे. हनुमान हे शक्तीचं दैवत असल्याने गावाचं रक्षण करण्यासाठी वेशीवरच हे मंदिर बांधण्यात आल्याचं सांगितलं जातं. या परिसरात दत्ताचंही छोटसं, सुंदर मंदिर आहे. हे मंदिरही पाहण्यासारखं आहे.

कसलेल्या गायकाने शांत, मंद गाणं गावं तशी खडावलीची नदी मंजुळ नाद करत वाहत असते... सगळ्या चिंता नदीच्या पात्रात काही वेळापुरत्या सोडून एखाद्या ध्यानस्थ ऋषीप्रमाणे किनाऱ्यावर बसून राहावं... शांततेचा उपभोग घेत!

....... .........

* इथे कसं पोहोचाल?

खडावली हे मध्य रेल्वेवरचं कसाऱ्याकडे जाताना टिटवाळ्याच्या पुढचं स्टेशन. इथे कसारा किंवा आसनगाव ट्रेनने जाता येतं. वाहनाने जायचं झाल्यास कल्याणहून टिटवाळ्याला जाणाऱ्या रस्त्यावरून खडावलीला जाता येतं.

* काय काळजी घ्याल?

नदीचं पात्र किनाऱ्याजवळ शांत आणि उथळ असलं तरी काही ठिकाणी ते खोल आणि धोकादायक आहे. त्यामुळे पोहण्यासाठी जास्त पुढे जाऊ नये. जायचं झाल्यास तिथल्या जाणकार स्थानिकांचा सल्ला घ्यावा. नदीच्या पाण्याचा आनंद घेताना तिथेच कचरा करू नका. पर्यावरणाचा समतोल राखणं हे आपलं कर्तव्य आहे.

ओढाळ नाणेघाटाचा ट्रेक



कल्याणहून एक रस्ता मुरबाड, टोकवाडी, माळशेज घाट करत नगरला जातो. कल्याणहून साधारण चाळीस-पंचेचाळीस कि.मी.वरचं सरळगाव सोडलं की सगळा मुलुख बदलतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारी भाताची शेतं, त्यात विसावलेली घरं हे दृश्य जाऊन निर्जन जंगल दिसू लागतं. बाहेरची विराटता आणि शांतता आपल्याला सगळं विसरायला लावून वेगळ्या प्रदेशात आल्याची जाणीव करून देते. त्यात उजवीकडे दूरवर दिसत असलेल्या सह्यादीच्या बेलाग डोंगररांगा आणि त्यातले काळेकभिन्न कडे आपल्याला होत असलेली जाणीव अधिक ठळक करत जातात.

हा आहे माळशेज घाटाच्या पायथ्याचा वैशाखरे, मोरोशी, सावणेर्चा ठाणे जिल्ह्यातला आदिवासी प्रदेश. या सगळ्यात उजवीकडच्या भल्यामोठ्या डोंगररांगेतून बाहेर आलेला एक मोठा कडा आपली नजर सतत वेधत असतो. विशेष म्हणजे खूप दूर असूनही त्याचं अस्तित्व आपल्याला ठळकपणे जाणवतं. त्याचं हे अस्तित्व नुसतं आकारामुळे नाही तर त्याच्या कित्येक वर्षांच्या अफाट कर्तृत्वामुळे आहे. हा कडा आहे 'नानाचा अंगठा' आणि त्याच्या बगलेतला त्यावेळच्या दख्खन पठारावरचा एक प्रमुख व्यापारीमार्ग 'नाणेघाट' आणि या दोघांच्याही मागे असलेला त्यांचा रक्षक 'जीवनधन' हा किल्ला.

आज या विराट आणि वैराण परिसराला आधुनिक सोयींचा पुसटसाही स्पर्श झाला नसला तरी फार प्राचीन काळापासून या परिसरात मोठ्या उलाढाली होत असल्यामुळे इथे मोठी सुबत्ता नांदत होती. सातवाहनांच्या आणि महाराजांच्या काळातही त्यावेळी जुन्नर ही दख्खनमधली मोठी बाजारपेठ होती. तर सोपारा आणि कल्याण ही नावाजलेली आंतरराष्ट्रीय बंदरं होती. या बंदरावरून उतरलेला सगळा माल नाणेघाटामागेर् देशावरच्या जुन्नरला जात असे. याची साक्ष पटवणाऱ्या अनेक खुणा आज भग्नावस्थेत असल्या तरी नाणेघाटाच्या तोंडावर एक माणूस आत बसू शकेल असा दगडी रांजण आजही इथे आहे. त्याकाळी यात रोजची जकात जमा होत असे.

नाणेघाटाचा ट्रेक हा डोंगरभटक्यांमध्ये अतिशय प्रिय आहे. मुरबाड-सरळगावच्या पुढे 'टोकावडे' हे या मार्गावरचं थोडंस मोठं गाव आहे. मात्र नाणेघाटात जाणारी पायवाट याच रस्त्यावरुन तीनेक कि.मी. पुढे गेल्यावर उजवीकडे आहे. याची खूण म्हणजे इथे उजवीकडेच 'ओतुर ४५' असा मैलाचा दगड आहे. त्यामुळे बसचं तिकिट वैशाखऱ्याच्या पुढच्या स्टॉपचं म्हणजे मोरोशीचं काढावं. टोकावड्याला बस कण्डक्टरला या जागी बस थांबवण्याची खास विनंती केली की आपली ही तीन कि.मी.ची चाल वाचते.

इथून उजवीकडे तिरकं बघितलं की नानाचा अंगठा समोर दिसतो आणि त्याच्या बाजूला दोन मोठे हाय टेंशन वायरचे टॉवर दिसतात. या टॉवरमधून इलेक्ट्रिक वायर्स खालच्या दरीत आलेल्या दिसतात. वर जाणारी वाट ही या सतत या वायर्सच्या खालून जाते. त्यामुळे उतरल्यावर पहिल्यांदा आपली दिशा निश्चित करण्यासाठी या टॉवर्सचा अंदाज घेतला पाहिजे. कारण वर जाणाऱ्या या वाटेव्यतिरिक्त सगळीकडे ताशीव कडे असल्याने वर जायला दुसरी वाट नाही.

या वाटेवर आल्यानंतर अगदी थोड्याच वेळात दोन वाटा आहेत. यातली एक मळलेली वाट डावीकडे जाते व दुसरी थोडीशी खाली उतरते. इथे मात्र सावध राहून खाली उतरणारी वाट पकडली की आपण सरळ नाणेघाटात पोहोचतो. सगळा रस्ता एकदम रूंद असला तरी दगडधोंड्यांचा आहे. रात्री ट्रेक करायचा असेल तर प्रत्येकाजवळ दोन अधिक सेल्ससह उत्तम विजेरी हवी. रमतगमत वरच्या गुहेपर्यंत जायला अडीच-तीन तास लागतात. बसमधून उतरल्यावर वर पोहोचेपर्यंत वाटेत पाण्याचा एक थेंबही मिळत नाही. पावसाळ्यात मात्र या मार्गावर प्रचंड पाणी वाहत असतं. कोणीही कधीही घसरू शकतो. त्यामुळे सोबत प्रथमोपचाराचं साहित्य असणं जरुरी आहे.

याच नानाच्या अंगठ्याच्या कड्यात मध्यभागी एक मोठी चौकोनी गुहा आहे. यात सहज पंचवीस एकजण मुक्काम करु शकतात. गुहेच्या बाजूलाच पाण्याची पाच-सात टाकं आहेत. इथे बाराही महिने चांगलाच गारवा असतो. त्यात गुहेची जमीन म्हणजे कातळ असल्याने खाली अंथरायला कॅरीमॅट आणि पांघरायला स्लिपिंग बॅग असायला हवी. ही गुहा निर्जन असल्याने मुक्कामी असेल तर बरोबर पातेली, शिधा आणि मेणबत्त्याही हव्यात. मात्र जीवधनचा ट्रेक करायचा असेल तर सगळं सामान सोबत नेणं अत्यंत आवश्यक आहे.

नाणेघाटाच्या डोंगरमाथ्याहून उजवीकडे एक-दीड कि.मी.वर 'घटघर' हे छोटंसं खेडं आहे. इथून उजवीकडे साधारण पाऊणेक तास डोंगर चढल्यावर आपण 'जीवधन' (समुदसपाटीपासून ३७५४ फूट) या किल्ल्यावर पोचतो. वर डोंगरात पाण्याची टाकी आणि काही डोंगरात खोदलेल्या खोल्या आहेत. डोंगराच्या एका कडेवरून खालच्या बाजूला 'खडा पारशी' किंवा स्थानिक भाषेत 'वांदरलिंगी' नावाने ओळखला जाणारा प्रचंड सुळका आहे. घाटघरहून वरती जाणारी वाट काही ठिकाणी निमुळती आहे. जीवधनवरून उत्तरेला कळसूबाई, दक्षिणेला भीमाशंकरची पर्वतरांग, ईशान्येला हरिश्चंदगड, वायव्येला माहुलीचा किल्ला तर खालचं नाणेघाटाचं पठार, नानाचा अंगठा असा अतिशय भव्य आणि विराट देखावा दिसतो.

काहीजण याचबरोबर जुन्नरकडे असलेले चावंड, हडसर आणि शेवटी शिवनेरी असाही ट्रेक करतात. घाटघरहून जुन्नरला जायला दिवसातून ठराविक वेळी बसेस आहेत. ज्याने कोणी एकदा का नाणेघटचा हा भन्नाट ट्रेक आणि तिथल्या गुहेत मुक्काम केला की त्याचे सह्यादीतल्या या डोंगराशी ऋणानुबंध होतात. नाणेघाटची गुहा त्याला वारंवार बोलावत राहते. काही जागा असतातचं अशा ओढाळ आणि सह्यादीत तर अशा जागा अगणित आहेत.

भोराईच्या किल्ल्यावर



-


सह्यादीतल्या किल्ल्यांमध्ये 'सुधागड' आपलं स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख समर्थपणे टिकवून आहे. फार कमी जणांना हा ऐतिहासिक आणि भौगोलिक संदर्भ माहीत आहे. मराठ्यांच्या राजधानीच्या ठिकाणासाठी महाराजांनी जवळजवळ हे ठिकाण निश्चित केलं होतं. गडावरची विस्तृत सपाटी हे त्यातलं महत्त्वाचं कारण असावं. त्यादृष्टीने त्यावेळच्या प्रमुख विचारवंतांनी या परिसराची कसून पाहणीही केली होती. पण शेवटी निवड झाली ती रायगडाची. त्यावेळची मोगलांबरोबरच्या झगड्याची व्याप्ती लक्षात घेतली तर या ठिकाणचा राजधानी म्हणून केलेला विचारच या ठिकाणाची भौगोलिक समर्थता दाखवतो.

महाराजांच्या अमदानीत १६४८ मध्ये हा किल्ला नारो अप्पाजी यांनी मुघलांकडून जिंकून स्वराज्यात आणला.

या किल्ल्याला आणखी एक ऐतिहासिक संदर्भ आहे. औरंगजेबाच्या मुलाने, शाहजादा अकबरने, बापाशी म्हणजे औरंगजेबाशी फारकत घेऊन मोगलांची छावणी सोडली आणि तो मराठ्यांना येऊन मिळाला. त्यावेळी त्याने याच परिसराचा आसरा घेतला होता. त्याने या गडाच्या धोंडसे आणि नाडसूर परिसरात दीर्घकाळ आपली छावणी टाकली होती. हा परिसर सह्यादीच्या ऐन गाभ्यातला आहे. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याचे विश्वासू मिर्झा यहुद्दीन शुजाई, वकील अब्दुल हमीद आणि दुर्गादास राठोड अशी मोगलांच्या बाजूची नामवंत मंडळी होती. ही घटना संभाजीराजांच्या काळातली आहे आणि ही घडामोड या प्रदेशाचं बेलागपण ठसठशीतपणे दाखवते.

या जागेचं आणखी एक महत्त्व म्हणजे भोर संस्थानच्या पंत सचिवांच्या कुलदेवतेचं, भोराईदेवीचं देऊळ गडावर आहे. इथे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी जत्रा भरते. त्यामुळे या किल्ल्याला 'भोराईचा किल्ला' असंही म्हटलं जातं. काही ठिकाणी या किल्ल्याचा उल्लेख 'घेरा सुधागड' असाही करण्यात आला आहे.

सुधागडच्या डोंगराचा घेर प्रचंड असल्याने पायथ्याचा परिसरही विस्तृत आहे. पायथ्याला नाडसूर, धोंडसे आणि वैतागवाडी अशी तीन गावं आहेत. यातल्या कुठल्याही गावातून गडावर जाता येत असलं तरी वैतागवाडीहून गडाच्या मुख्य वाटेला जाणारी पायवाट बऱ्यापैकी सोयीची आहे. पहिल्या अर्ध्या तासाची सपाटीवरची चाल सोडली तर गडापर्यंत जाणारी वाट गर्द रानातून जाते. मधला अर्ध्याएक तासाचा टप्पा प्रचंड दगडधोंड्यांचा आहे. साधारण पाऊण टप्पा पार केला की वाटेच्या बाजूलाच डावीकडे पाण्याची टाकी आहे. इथे कातळात कोरलेली 'बहिरोबा'ची प्रतिमा आहे.

गडावर रमतगमत जायला अडीच ते तीन तास लागतात. सगळा चढ अजिबात अंगावर येणारा नाही. गडाच्या सगळ्या उतारांवर प्रचंड रान असून यात भेकरं, कोल्हे, माकडं आणि तुरळक प्रमाणात अस्वलंही आहेत.

गडावर प्रचंड मोठी सपाटी असून या सपाटीवर मध्येमध्ये दाट जंगलाचे पुंजके आहेत. गडमाथ्यावर मोकळ्या जागेत भोराईदेवीचं चांगलंच मोठं आणि बऱ्यापैकी स्थितीत असलेलं देऊळ आहे. देवळाच्या गाभाऱ्याबाहेरच्या मंडपात पंचवीसेक जण सहज मुक्काम करू शकतात. बाहेरच्या पटांगणात शेकोटीभोवती बसून मोकळ्या वाऱ्यात गप्पाही मारता येतात. देवळापासून पाच मिनिटं चालत जाण्याच्या अंतरावर पण गर्द झाडीत पंतप्रतिनिधींचा त्यावेळी बांधलेला मोठा वाडा आहे. आता हा वाडा पडक्या स्थितीत असला तरी त्याच्या ओसरीत पंचवीसेक जण सहज राहू शकतात. वाड्याला मोठं कूस असल्याने सुरक्षितही वाटतं. या दोन्ही ठिकाणांपासून पाच ते दहा मिनिटांवर एक मोठं तळं आहे. पण इथलं पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे इथे मुक्काम करायचा असल्यास सोबत पिण्याच्या पाण्याचा भरपूर साठा हवाच.

गडाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे भरपूर प्रमाणावर साप आहेत. इतके की इथे परंपरेने 'अजिबात नांगरट करायची नाही', असा जणू अलिखित नियमच आहे. जो इथे नांगरट करेल त्याचा निर्वंश होईल, असा इथल्या स्थानिकांचा समज आहे. त्यामुळे रात्रीच्या शेकोटीसाठी किंवा जेवणासाठीचा लाकूडफाटा दिवसाच्या उजेडातच करावा. मुक्कामाच्या जागेची, त्यातही कोपऱ्यांची काटेकोरपणे तपासणी करून मगच तिथे राहावं.

नाडसूरला जाण्यासाठी ठाण्याहून सकाळी थेट बस आहे. याव्यतिरिक्त पालीहून बसने किंवा सहा आसनी रिक्षाने जाता येतं. गडावर लोणावळा-आंबवणे, तैलबैला करत 'वझरी'च्या खिंडीतून नाडसूर गाठता येतं. तसं मुळशी-पवना खोऱ्यातल्या जंगलातूनही हा परिसर गाठता येतो. मागतले इथले काही विस्तृत प्रदेश आजही निर्जन असल्याने अत्यंत माहितगार असणारा स्थानिक सोबत असणं आवश्यक आहे

रिफ्रेशिंग अर्नाळा



:


ठाणे जिल्ह्याच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर अनेक पर्यटनस्थळं हाऊसफुल्ल होतायत. कमीतकमी वेळात फिरण्याची ठिकाणं भटकंतीप्रेमींना हवीच असतात. त्याच लिस्टमधलं रिफ्रेश करणारं ठिकाण म्हणून अर्नाळ्याचं नाव आहे. होडीतला आनंद, बिचवरची मजा, ऐतिहासिक वास्तू, तसंच मासेखाऊंसाठी मेजवानीचं ठिकाण म्हणजे अर्नाळा.

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर डोंगररांगेतून उमग पावलेली वैतारणा नदी याच अर्नाळा किल्ल्याच्या खाडीमुखाशी मिळते. इथे वैतरणा खाडीमुखाशी भर सागराच्या कुशीत वसलेल्या या अर्नाळा किल्ल्याने आपलं स्वतंत्र अस्तित्व जपलंय.

अर्नाळा गाठायला पश्चिम रेल्वेचं विरार रेल्वे स्टेशनवर जायचं. विरारपासून १४ किमीवर अर्नाळा कोळीवाडा आहे. तिथे बससेवा चांगली आहे. किंवा वसईहूनही अर्नाळ्याला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला बसेस आहेत.

अर्नाळा बस स्थानक ऐन बाजारपेठेत असल्याने खाण्याची उत्तम सोय होते. बाजारातून मासळीचा वास घेत किनारा गाठायचा. किनाऱ्यावर कोळणी मासे विकताना, तर पुरुष कावड घेऊन बर्फ, मच्छीची वाहतूक करताना दिसतात.

किनाऱ्यावरून अर्नाळा बेटावर जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला फेरी बोट उपलब्ध आहे. साधारण पंधरा-वीस मिनिटात अर्नाळा बेट गाठता येतं. संपूर्ण नारळाच्या झाडांनी हे बेट व्यापलेलं आहे. बेटाच्या पश्चिम टोकावर किल्ला असल्याने भर वस्तीच्या बोळातून किल्ला गाठायचा. वाटेतच कोळ्यांची जाळी, होडीचे नांगर, सुकत टाकलेली मच्छी, खार लावलेली मच्छी असे अनेक प्रकार पाहायला मिळतात.

अर्नाळा किल्ल्याचं भक्कम प्रवेशद्वार पाहून किल्ल्याच्या बांधकामाची कल्पना येते. या महाद्वारावर व्यास किंवा व्याघ्य्र आणि हत्ती यांची सुबक शिल्पं कोरलेली आहेत. समोरच्याच कमानीवर वेली-फुलांची बुट्टी आपल्याला खिळवून ठेवते. उत्तराभिमुख असलेल्या या प्रवेशद्वारावर देवनागरीमधे शके १६५९ मधला शिलालेख लिहिलेला आहे. इथून आत गेल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. उजव्या हातालाच साधारण दहा फुटांवर छोटी देवडी दिसते. ही देवडी थेट प्रवेशद्वारावरील तटरक्षकांच्या इथे मिळते. संरक्षणाच्या योजनेचा एक मोठा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो.

मुख्य गडात प्रवेश केल्यावर समोरच प्रशस्त शेती दिसते. या आखीव शेतीमुळेच गडाचं रूप खुलून दिसतं. सरळ पुढे चालत गेल्यावर उजव्या हाताला कौलारू घरासारखा दर्गा आहे. तर डाव्या हाताने चालत गेल्यास पूवेर्च्या तटाजवळ त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच टुमदार वटवृक्ष असल्याने इथे थोडा वेळ बसून विश्रांती घ्यायला हरकत नाही. इथे समोर गोड्या पाण्याचा तलाव बांधून घेतलेला आहे. तर तटांवर उत्खननात सापडलेल्या गणेशाच्या मूतीर्ची स्थापना केलेली आहे. इथूनच मागे वळून तटाच्या आतील बाजूने तटांवर जाण्यास पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी तटांवरच्या फेरीस सुरुवात करायची. एकूण नऊ बुुरूज असलेला आणि तीन प्रवेशद्वार असलेला हा किल्ला इतिहासात स्वत:च वेगळं अस्तित्व ठेवून आहे.

या जलदुर्गाची उभारणी गुजरातच्या सुलतानाने इ.स. १५१६ मधे केली. पुढे १५३० मधे हा किल्ला पोर्तुगिजांनी आणि त्यानंतर १७३७ मधे मराठ्यांनी जिंकला. या जलदुर्गाच्या रक्षणासाठी मराठ्यांनी दोन हजारी सैन्य गडावर ठेवलं होतं. असे दाखले इतिहासात सापडतात. बेटावर असलेल्या कालिका मातेचं दर्शन घायचं आणि पुन्हा किनारा गाठायचा.

निसर्गाच्या सान्निध्यातले दोन दिवस घालवून नव्या जोमाने कामाला लागू शकतो.


निसर्गराजा, ऐक सांगतो!



पावसाळा सुरू झाला की निसर्गवेड्यांना वेध लागतात ते वीकएण्ड पिकनिक्सचे. प्रत्येकातच एक निसर्गवेडा लपलेला असतो. शहरातल्या धकाधकीच्या आयुष्यात आपली नेहमीची कामं सोडून वारंवार निसर्गाशी गळाभेट घेता येत नाही. पण पावसाळ्यात मात्र निसर्गाला उराउरी भेटण्यावाचून पर्यायच उरत नाही. लोणावळ्यासारख्या टिपिकल पावसाळी ठिकाणी जाणारे फॅमिली टुरिस्ट असोत किंवा डोंगराच्या कडेकपाऱ्यांमध्ये निसर्गाच्या हिरव्या दुलईवरून मुक्तपणे फिरणारे भटके असोत, पावसाळा आला की स्वत:च्याही नकळत झपाटल्याप्रमाणे निसर्गाच्या कुशीत शिरायला आपण आतूर होतो.

हल्ली त्याच त्याच ठिकाणी जाण्यापेक्षा नवी ठिकाणं शोधण्याकडे कल जास्त आहे. लोणावळ्यासारख्या ठिकाणी भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पाण्यापेक्षा माणसंच अधिक असतात. काही वर्षांपूवीर् याचा उबग येऊन अशाच काही भटक्यांनी अॅम्बी व्हॅलीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर डोंगराच्या कुशीत दडलेला एक अप्रतिम धबधबा शोधून काढला. आता मात्र भुशी डॅम इतकीच या धबधब्यावरही गदीर् उसळलेली असते. शिवाय, दारूड्या पर्यटकांचा त्रास होतो तो वेगळाच. त्यामुळेच लोणावळा, माळशेज घाट यांसारखी दृष्ट लावणारी ठिकाणं फॅमिली टुरिस्टना नकोशी झाली आहेत. शिवाय, ट्रेकर मंडळींनाही या ठिकाणांचं फार आकर्षण राहिलेलं नाही.

लोणावळ्याच्या तुलनेत खंडाळा मात्र अजूनही पर्यटकांच्या गदीर्पासून काहीसा लांब आहे. पर्यटकांपेक्षा ट्रेकर्सचा ओढा खंडाळ्याकडे जास्त आहे, तो इथले हिरवेगार डोंगर आणि इथल्या प्रख्यात ड्युक्स नोजमुळं. रेल्वे ट्रॅक सोडून हिरवीकंच वस्त्र ल्यालेल्या डोंगराच्या कुशीत शिरलं की, बाहेरच्या जगाची कणमात्र आठवण राहात नाही. आपल्या खांद्यापर्यंत उतरलेले ढग, सतत रिपरिपणारा पाऊस, थंडगार हवा, जिकडे पाहावं तिकडे हिरवाईचं साम्राज्य... निसर्ग असा मोकाट सुटलेला असतो की त्याचं हे मुक्त बागडणं बघून आपल्याही मनात हर्ष दाटून येतो. शहरात विकासाच्या नावाखाली निसर्गाचा गळा घोटणारे आपण तिकडे मात्र निसर्गाचा हात पकडून तो नेईल तिथे त्याच्याबरोबर जातो.

खंडाळ्यापर्यंत जायची इच्छा नसेल तर त्याच्या अलीकडेही काही चांगली ठिकाणं आहेत, जी अजून तरी पर्यटकांच्या गदीर्पासून लांब आहेत. नेरळला उतरायचं ते माथेरानला जाण्यासाठीच. माथेरानचा पाऊस ही खास अनुभवण्यासारखी चीज आहेच; पण माथेरानपर्यंत पोहोचायच्या आधी स्टेशनपासून १५ मिनिटांवरच भान हरवायला अनुभव देणारं ठिकाण आहे ते म्हणजे टपालवाडी. स्टेशनला उतरून रस्त्यानं माथेरानच्या दिशेने पायी निघालं की, १० मिनिटांत उजव्या हाताला एक तलाव लागतो. या तलावावरून पुढे चालत गेलं की सामोरा येतो तो टपालवाडीचा धबधबा. हा सर्व परिसरच तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. शुद्ध हवा, नजर पोहोचेल तिथवर हिरवं साम्राज्य, आकाशातून सुरू असलेला पावसाचा अभिषेक आणि शुभ्र दुधासारखा वाहणारा धबधबा आणि हे सर्व ठाण्यापासून जेमतेम तासा-दीड तासाच्या अंतरावर.

असंच एक ठिकाण कर्जतला आहे. त्याचं नाव आहे कोंडाणा केव्ज. राजमाचीच्या पायथ्याशी असलेल्या या बौद्धकालीन गुंफा अतिशय देखण्या आहेत. कर्जत स्टेशनला उतरून एसटी किंवा सहा आसनी रिक्षाने कोंदिवडे गावाला उतरलं की तिथून पायी चालत तासाभरात या गुंफापाशी पोहोचता येतं. इथूनच पुढे राजमाचीला जायचा रस्ता आहे. इसवी सन पूर्व दुसऱ्या आणि पहिल्या शतकातल्या या गुंफा काळाचे घाव सोसत अजूनही उभ्या आहेत. एक चैत्यस्तूप आणि सात विहार यांचा समावेश असलेल्या या गुंफातील कोरीवकाम दृष्ट लागण्यासारखं आहे.

ज्यांना डोंगरदऱ्यांत भटकण्याची हौस नसेल त्यांच्यासाठी मुंबई-ठाण्याच्या आसपास अनेक समुदकिनारे आहेत. अलिबागच्या समुदकिनाऱ्यावरही माणसांची गदीर् उसळलेली असते. पण अलिबागला लागूनच असलेले आक्षी, नागाव आणि रेवदंड्याच्या किनाऱ्यांवर मात्र तुलनेने कमी गदीर् असते. वरून कोसळणारा पाऊस आणि समोर उधाणलेला समुद हे दृष्य मन मोहून टाकणारं आणि चित्तवृत्ती भारणारं आहे. रेवदंड्याच्याच पुढे कोरलईचा किल्लाही पाहण्यासारखा आहे. या किल्ल्यावरून अलिबागपर्यंतचा समुदकिनारा दृष्टीपथात येतो. इथेच दीपस्तंभही आहे. मात्र, या किल्ल्यावर जाण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्यामुळे जेमतेम मोटारसायकली इथे जाऊ शकतात.

ठाणे जिल्ह्यात डहाणू, बोडीर्चा समुद वीकएण्ड पर्यटनासाठी आदर्श आहे. डहाणू हा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील विभाग म्हणून घोषित करण्यात आला असल्यामुळे इथे एखाद दोन अपवाद वगळता मोठे उद्योग नाहीत. त्यामुळे इथला निसर्गरम्य परिसर अद्यापि टिकून आहे. पालघर, सफाळे, डहाणू, बोडीर् हा सारा परिसर म्हणजे निसर्गाची खाण आहे.

या शिवाय, ठाणे जिल्ह्याचं महाबळेश्वर म्हणून ख्यातकीर्त असलेलं जव्हार हेही वीकएण्ड पिकनिकसाठी आदर्श ठिकाण आहे.
original at - http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/3127845.cms

Tribal toursim!

Virtual Tour - Dahanu's Mahalaxmi

Find us on Facebook

Map to Mahalaxmi

Dahanu Road Station [Western Rail way Mumbai suburban last station]> Charoti > Mahalaxmi 1. All MSRTC Buses routed to Mahalaxmi yatra 2. Regular 6 seater from Dahanu to Mahalaxmi 3. 6 seater from Dahanu to charoti & charoti to mahalaxmi autorikshaw 4. Individual vehicles [mahalaxmi is on NH 8, 125km from Mumbai towards Ahemadabad

Tribal Tourism