-
सह्यादीतल्या किल्ल्यांमध्ये 'सुधागड' आपलं स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख समर्थपणे टिकवून आहे. फार कमी जणांना हा ऐतिहासिक आणि भौगोलिक संदर्भ माहीत आहे. मराठ्यांच्या राजधानीच्या ठिकाणासाठी महाराजांनी जवळजवळ हे ठिकाण निश्चित केलं होतं. गडावरची विस्तृत सपाटी हे त्यातलं महत्त्वाचं कारण असावं. त्यादृष्टीने त्यावेळच्या प्रमुख विचारवंतांनी या परिसराची कसून पाहणीही केली होती. पण शेवटी निवड झाली ती रायगडाची. त्यावेळची मोगलांबरोबरच्या झगड्याची व्याप्ती लक्षात घेतली तर या ठिकाणचा राजधानी म्हणून केलेला विचारच या ठिकाणाची भौगोलिक समर्थता दाखवतो.
महाराजांच्या अमदानीत १६४८ मध्ये हा किल्ला नारो अप्पाजी यांनी मुघलांकडून जिंकून स्वराज्यात आणला.
या किल्ल्याला आणखी एक ऐतिहासिक संदर्भ आहे. औरंगजेबाच्या मुलाने, शाहजादा अकबरने, बापाशी म्हणजे औरंगजेबाशी फारकत घेऊन मोगलांची छावणी सोडली आणि तो मराठ्यांना येऊन मिळाला. त्यावेळी त्याने याच परिसराचा आसरा घेतला होता. त्याने या गडाच्या धोंडसे आणि नाडसूर परिसरात दीर्घकाळ आपली छावणी टाकली होती. हा परिसर सह्यादीच्या ऐन गाभ्यातला आहे. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याचे विश्वासू मिर्झा यहुद्दीन शुजाई, वकील अब्दुल हमीद आणि दुर्गादास राठोड अशी मोगलांच्या बाजूची नामवंत मंडळी होती. ही घटना संभाजीराजांच्या काळातली आहे आणि ही घडामोड या प्रदेशाचं बेलागपण ठसठशीतपणे दाखवते.
या जागेचं आणखी एक महत्त्व म्हणजे भोर संस्थानच्या पंत सचिवांच्या कुलदेवतेचं, भोराईदेवीचं देऊळ गडावर आहे. इथे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी जत्रा भरते. त्यामुळे या किल्ल्याला 'भोराईचा किल्ला' असंही म्हटलं जातं. काही ठिकाणी या किल्ल्याचा उल्लेख 'घेरा सुधागड' असाही करण्यात आला आहे.
सुधागडच्या डोंगराचा घेर प्रचंड असल्याने पायथ्याचा परिसरही विस्तृत आहे. पायथ्याला नाडसूर, धोंडसे आणि वैतागवाडी अशी तीन गावं आहेत. यातल्या कुठल्याही गावातून गडावर जाता येत असलं तरी वैतागवाडीहून गडाच्या मुख्य वाटेला जाणारी पायवाट बऱ्यापैकी सोयीची आहे. पहिल्या अर्ध्या तासाची सपाटीवरची चाल सोडली तर गडापर्यंत जाणारी वाट गर्द रानातून जाते. मधला अर्ध्याएक तासाचा टप्पा प्रचंड दगडधोंड्यांचा आहे. साधारण पाऊण टप्पा पार केला की वाटेच्या बाजूलाच डावीकडे पाण्याची टाकी आहे. इथे कातळात कोरलेली 'बहिरोबा'ची प्रतिमा आहे.
गडावर रमतगमत जायला अडीच ते तीन तास लागतात. सगळा चढ अजिबात अंगावर येणारा नाही. गडाच्या सगळ्या उतारांवर प्रचंड रान असून यात भेकरं, कोल्हे, माकडं आणि तुरळक प्रमाणात अस्वलंही आहेत.
गडावर प्रचंड मोठी सपाटी असून या सपाटीवर मध्येमध्ये दाट जंगलाचे पुंजके आहेत. गडमाथ्यावर मोकळ्या जागेत भोराईदेवीचं चांगलंच मोठं आणि बऱ्यापैकी स्थितीत असलेलं देऊळ आहे. देवळाच्या गाभाऱ्याबाहेरच्या मंडपात पंचवीसेक जण सहज मुक्काम करू शकतात. बाहेरच्या पटांगणात शेकोटीभोवती बसून मोकळ्या वाऱ्यात गप्पाही मारता येतात. देवळापासून पाच मिनिटं चालत जाण्याच्या अंतरावर पण गर्द झाडीत पंतप्रतिनिधींचा त्यावेळी बांधलेला मोठा वाडा आहे. आता हा वाडा पडक्या स्थितीत असला तरी त्याच्या ओसरीत पंचवीसेक जण सहज राहू शकतात. वाड्याला मोठं कूस असल्याने सुरक्षितही वाटतं. या दोन्ही ठिकाणांपासून पाच ते दहा मिनिटांवर एक मोठं तळं आहे. पण इथलं पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे इथे मुक्काम करायचा असल्यास सोबत पिण्याच्या पाण्याचा भरपूर साठा हवाच.
गडाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे भरपूर प्रमाणावर साप आहेत. इतके की इथे परंपरेने 'अजिबात नांगरट करायची नाही', असा जणू अलिखित नियमच आहे. जो इथे नांगरट करेल त्याचा निर्वंश होईल, असा इथल्या स्थानिकांचा समज आहे. त्यामुळे रात्रीच्या शेकोटीसाठी किंवा जेवणासाठीचा लाकूडफाटा दिवसाच्या उजेडातच करावा. मुक्कामाच्या जागेची, त्यातही कोपऱ्यांची काटेकोरपणे तपासणी करून मगच तिथे राहावं.
नाडसूरला जाण्यासाठी ठाण्याहून सकाळी थेट बस आहे. याव्यतिरिक्त पालीहून बसने किंवा सहा आसनी रिक्षाने जाता येतं. गडावर लोणावळा-आंबवणे, तैलबैला करत 'वझरी'च्या खिंडीतून नाडसूर गाठता येतं. तसं मुळशी-पवना खोऱ्यातल्या जंगलातूनही हा परिसर गाठता येतो. मागतले इथले काही विस्तृत प्रदेश आजही निर्जन असल्याने अत्यंत माहितगार असणारा स्थानिक सोबत असणं आवश्यक आहे